सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सातारा : प्रतिनिधी
शाळा या जीवन शिक्षण देणाऱ्या मंदिरांप्रमाणे असून, केवळ भौतिक सुविधांपेक्षा विद्यार्थ्यांना दिले जाणारे गुणवत्तापूर्ण शिक्षण अधिक महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले.
प्रतापसिंह हायस्कूल येथे आयोजित ‘विद्यार्थी स्वागत व प्रवेशोत्सव २०२६’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नगरसेविका भारती शिंदे, किरण पाटील, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पाटील म्हणाले की, आज प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी अनेक जण भविष्यात देशपातळीवर शाळेचे नाव उज्ज्वल करतील. प्रतापसिंह हायस्कूलला समृद्ध आणि गौरवशाली ऐतिहासिक परंपरा लाभली असून, या संस्थेने अनेक मान्यवर घडविले आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे प्रकांड पंडित तसेच मुंबई प्रांताचे माजी मुख्यमंत्री धनजीशा कूपर यांच्यासह अनेक उद्योजक, कृषितज्ज्ञ आणि नेते या शाळेचे माजी विद्यार्थी राहिले आहेत.
शाळेची ही उज्ज्वल परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची असल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून आयएएससारख्या उच्च पदांवर पोहोचावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देऊन शाळेचे नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमादरम्यान दोन विद्यार्थिनी आणि एका विद्यार्थ्याने उत्स्फूर्त मनोगत व्यक्त केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रवेशोत्सवाच्या माध्यमातून नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले.
