सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत असलेल्या मोटार वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविण्यासाठी राज्य शासनाने ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. वाहनधारकांनी तसेच विविध कार्यालय प्रमुखांनी आपल्या वाहनांवर एचएसआरपी बसवून घ्याव्यात, असे आवाहन बारामतीचे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहूल गावडे यांनी केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये होणारी छेडछाड व बनावटगिरी रोखणे, गुन्हेगारी घटनांमध्ये वाहनांची अचूक ओळख पटविणे आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने वाहनांची नोंद अधिक सुरक्षित करणे यासाठी सर्व वाहनांना एचएसआरपी बसविणे आवश्यक करण्यात आले आहे.
नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तसेच शासनाच्या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने हा निर्णय घेतला असून, वाहनधारकांनी मुदतीपूर्वी एचएसआरपी बसवून घ्यावी, असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे.
बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील वाहनांसाठी M/s FTA HSRP Solutions Pvt. Ltd. या संस्थेची अधिकृत उत्पादक म्हणून निवड करण्यात आली असल्याची माहितीही श्री. गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
