Purandar News | किलबिल इंग्लिश मीडियम स्कूलला ‘आदर्श प्री-स्कूल पुरस्कार २०२६’

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
पुरंदर : प्रतिनिधी 
 दि. १५ : शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत सरस्वती ज्ञान संस्था संचलित किलबिल इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्री-स्कूल विभागाला ‘आदर्श प्री-स्कूल पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. पुण्यातील सारथी सभागृह येथे आयोजित विशेष समारंभात हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात आला.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचे राज्यमंत्री डॉ. पंकज भौयर, राज्यसभा खासदार प्राचार्य मेघाताई कुलकर्णी, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी तसेच शिक्षक आघाडी, पुणे शहरचे अध्यक्ष प्रा. सुनील मोरे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
किलबिल इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्री-स्कूल विभागाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे हा सन्मान मिळाला. विद्यालयाच्या वतीने संस्थापक श्रीकांत जगताप व प्राचार्या मनिषा जगताप यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
सासवड व परिसरातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडणीत किलबिल इंग्लिश मीडियम स्कूलने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. ‘आरोग्य, संस्कार आणि शिक्षण’ या त्रिसूत्रीवर आधारित शैक्षणिक उपक्रमांमुळे विद्यालयाने वेगळी ओळख निर्माण केली आहे. आधुनिक शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, परंपरा आणि नैतिक मूल्यांचे शिक्षण देण्यावर विद्यालयाचा विशेष भर आहे.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध सण-उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम, पालकांसाठी व्याख्याने व चर्चासत्रे तसेच अनेक उपक्रम सातत्याने राबविले जातात. या यशामागे संस्थापक श्रीकांत जगताप, प्राचार्या मनिषा जगताप, शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थ्यांचे मोलाचे योगदान असल्याचे विद्यालय व्यवस्थापनाने नमूद केले.

दरम्यान, हा पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर शिक्षण क्षेत्रासह विविध स्तरांतून किलबिल इंग्लिश मीडियम स्कूलचे अभिनंदन व कौतुक होत आहे.
To Top