सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मोरगाव : हेमंत गडकरी
सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयात पाचवीच्या वर्गात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विद्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून मुख्य इमारतीपर्यंत ढोल-ताशांच्या गजरात स्वागत फेरी काढण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाला सोमेश्वर साखर कारखान्याचे संचालक हरिभाऊ भोंडवे, शिक्षण संस्थेचे सचिव भारत खोमणे, आंबी बुद्रुकच्या सरपंच शीतल जगताप, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लालभाई शेख, सामाजिक कार्यकर्ते विजय कुतवळ तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रतिभा कुलकर्णी यांनी प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांचे स्वागत करत शाळेच्या शैक्षणिक वाटचालीची माहिती दिली. शिक्षिका नूतन काळाणे यांनी विद्यालयात राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष जेधे यांनी केले, तर आभार प्रदर्शन हेमंत गडकरी यांनी मानले. नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत झाल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.
