सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सुपे येथील एका शेतकऱ्याने कृषी सेवा केंद्राकडून छापील कमाल किरकोळ किंमतीपेक्षा (MRP) जास्त दर आकारून फसवणूक केल्याचा आरोप करत संबंधित प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे.
सुपे येथील सचिन काळखैरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी दि. ८ जून २०२६ रोजी मोरया कृषी सेवा केंद्र, सुपे येथून वेदांत कंपनीची १० किलो वजनाची सल्फर बॅग खरेदी केली. संबंधित उत्पादनाच्या पॅकेटवर कमाल किरकोळ किंमत (MRP) ७२० रुपये छापलेली असताना दुकानदाराने त्यांच्याकडून ९०० रुपये वसूल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे त्यांना १८० रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागल्याचे त्यांनी म्हटले आहे.
काळखैरे यांनी या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करून दुकानदाराविरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच खरेदीचे बिल आणि उत्पादनावरील MRP दर्शविणारे छायाचित्रही पुरावा म्हणून सादर केले आहे.
ग्राहक संरक्षण कायद्यानुसार कोणत्याही वस्तूची विक्री छापील MRP पेक्षा जास्त दराने करणे बेकायदेशीर मानले जाते. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
शेतकऱ्यांची फसवणूक थांबवण्यासाठी प्रशासनाने तत्काळ दखल घ्यावी, अशी मागणी - सचिन काळखैरे यांनी केली आहे.
