सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुणे : प्रतिनिधी
पुणे, दि. १५ (प्रतिनिधी): जिल्ह्यातील रस्ते अपघातांमुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी अपघातप्रवण (ब्लॅक स्पॉट) ठिकाणांची संयुक्त प्रत्यक्ष पाहणी करून अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना तातडीने सुचवाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या. या उपाययोजनांच्या अंमलबजावणीबाबत लवकरच स्वतंत्र आढावा बैठक घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गिल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर, पुणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त संदीप भाजीभाकरे, प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी तसेच विविध विभागांचे व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डुडी म्हणाले की, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील अपघातांमुळे होणारे मृत्यू रोखणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. पोलीस विभाग, परिवहन विभाग, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी संयुक्तपणे ब्लॅक स्पॉटची पाहणी करावी. अपघातांची कारणे व आवश्यक उपाययोजनांचा अहवाल २९ जून २०२६ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
अपघात रोखण्यासाठी सुचविण्यात आलेल्या उपाययोजनांची संबंधित विभागांनी गांभीर्याने अंमलबजावणी करावी. यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. नवले ब्रिज परिसरातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी यापूर्वी सुचविलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने करावी. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात अपघात कमी करण्यास प्राधान्य दिले जात असल्याचे सांगितले. राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यांजवळ जनजागृतीपर मोठे फलक उभारण्यात यावेत, अशी सूचना त्यांनी केली. तसेच जिल्हा पोलीस ग्रामीण दलाकडून अपघातप्रवण स्थळांची यादी लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यानंतर सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसह संयुक्त पाहणी दौऱ्यांचे आयोजन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
बैठकीत परिवहन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी रस्ते अपघात कमी करण्यासाठी सुरू असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती सादर केली.
