Pune Airport | पुणे विमानतळावर वाहनचालकांसाठी नवा नियम; ‘अरायव्हल झोन’मध्ये पाळावा लागगणार 'हा' नियम; अन्यथा होऊ शकते कारवाई

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
पुणे : प्रतिनिधी
पुणे विमानतळावर प्रवाशांना घेण्यासाठी किंवा सोडण्यासाठी येणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. विमानतळ परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि वाहतुकीला अधिक शिस्तबद्ध करण्याच्या उद्देशाने पुणे विमानतळ प्रशासनाने ‘अरायव्हल झोन’मध्ये वाहनांच्या थांबण्याच्या वेळेवर मर्यादा घालण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.
या प्रस्तावानुसार, आगमन विभागात वाहनांना केवळ १५ मिनिटे थांबण्याची परवानगी असेल. त्यापेक्षा अधिक वेळ वाहन उभे राहिल्यास संबंधित वाहनचालकावर दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. हा प्रस्ताव सध्या Airports Authority of India (AAI) कडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला असून मंजुरी मिळाल्यानंतर तो लागू केला जाणार आहे.
पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक वाहनचालक प्रवाशांच्या प्रतीक्षेत आगमन विभागात दीर्घकाळ वाहन उभे ठेवतात. त्यामुळे विशेषतः सकाळ व संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत वाहतूक कोंडी निर्माण होते. याचा फटका प्रवासी, टॅक्सी चालक तसेच इतर वाहनधारकांना बसत आहे.
या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने १५ मिनिटांच्या मर्यादेचा प्रस्ताव मांडला आहे. यामुळे वाहनांची ये-जा जलद होऊन विमानतळ परिसरातील वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होईल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र, या प्रस्तावावर प्रवाशांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी या निर्णयाचे स्वागत करत वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, असे मत व्यक्त केले आहे. तर काही प्रवाशांनी विमान उशिरा येणे, सामान मिळण्यास होणारा विलंब किंवा प्रवासी बाहेर येण्यासाठी लागणारा अतिरिक्त वेळ यामुळे वाहनचालकांना अनावश्यक दंड भरावा लागू शकतो, अशी चिंता व्यक्त केली आहे.

दरम्यान, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विमान सुरक्षेसाठीही विमानतळ प्रशासनाने विशेष उपाययोजना सुरू केल्या आहेत. पक्ष्यांमुळे विमानांना होणारा धोका टाळण्यासाठी नियमित गवत कापणे, बर्ड चेझर्सची नियुक्ती, झोन गनचा वापर तसेच विविध तांत्रिक उपाय राबविण्यात येत आहेत. या उपाययोजना भारतीय हवाई दलाच्या समन्वयाने करण्यात येत आहेत.

तसेच विमानतळ परिसरातील मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुणे महानगरपालिका यांच्या सहकार्याने मार्च आणि एप्रिल महिन्यात विशेष मोहीम राबविण्यात आली असून या समस्येवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. वाहतूक कोंडी रोखण्यासाठीचा हा प्रस्ताव मंजूर झाल्यास पुणे विमानतळावर वाहनचालकांना वेळेचे काटेकोर पालन करावे लागणार आहे.
To Top