सुपे परगणा l इंग्रजी शाळांच्या स्पर्धेत स्वतःच्या मुलासाठी मराठी शाळेची निवड; पोलीस अधिकारी मनोज नवसरे यांचा आदर्श निर्णय

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सुपे : दिपक जाधव
शिक्षकांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने एक चांगला विद्यार्थी घडवणे हेच मोठे ध्येय असते. माझा विद्यार्थी घडला आणि मोठ्या पदावर गेला हेच त्या शिक्षकांसाठी अभिमानाची बाब असते असे प्रतिपादन सुपे येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांनी केले.
     बोरकरवाडी ( ता. बारामती ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सुप्याचे सपोनि मनोजकुमार नवसरे यांनी आपला पाल्य विराज याचा इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतला. यावेळी ते बोलत होते. आत्तापर्यंत मराठी माध्यमातूनच शिकून उच्चपदस्थ अधिकारी झाले. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांनी याचे भान ठेवुन इंग्रजी माध्यमातील शाळांवर होणारा खर्च टाळून आपल्या मुलांचा मराठी शाळेत प्रवेश घ्यावा असे आवाहन नवसरे यांनी केले.
         सद्या आपल्या पाल्याला चांगल्या उच्च इग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेण्याची स्पर्धा लागली आहे. मुलांच्या भविष्याची स्वप्न पहात पालक लाखो रुपये शिक्षणावर खर्च करताना दिसत आहे. यातूनच इंग्रजी माध्यमांच्या शाळा, खाजगी शाळा, ॲकॅडमी पॅटर्न यांचे पेव मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. त्यामुळे मराठी शाळा यापुढे टिकतील का नाही याची भीती सद्या वाटू लागली आहे. 
          बारामती तालुक्यातील सुपे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक, कर्तव्यदक्ष अधिकारी मनोज नवसरे यांनी सपत्निक येऊन आपला पाल्य विराज नवसरे याचा बोरकरवाडी जि. प. शाळेत इयत्ता पहीली मध्ये प्रवेश घेतला. सुपे येथील उच्चपदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत असताना देखील नवसरे यांनी आपला पाल्य मराठी शाळेत दाखल करून एक आदर्श निर्माण केला आहे. 
         बोरकरवाडी येथील शिक्षक शहाजी कुंभार आणि सुवर्णा कुतवळ यांनी पहिलीत प्रवेश घेतलेल्या नवगत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी बोरकरवाडी येथील सर्वेक्षनानुसार चार मुले पाहिलीसाठी दाखल पात्र आहेत. मात्र आजूबाजूच्या परिसरातील मुले येथे पाहिलीसाठी प्रवेश घेतायेत. येथील शाळेची गुणवत्ता चांगली असुन विविध उपक्रम राबवीत असल्याची माहिती केंद्रप्रमुख शरद मचाले यांनी दिली. 
         याप्रसंगी बारामती पंचायत समितीच्या विद्यमान सदस्या उज्वला खैरे, बारामती तालुका भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष पोपट खैरे, कुतवळवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच रूपाली भोसले, उपसरपंच दिपाली बोरकर, ग्रामपंचायत सदस्य भानुदास बोरकर, ग्रा. पं. सदस्या राणी बोरकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष बोरकर, पालक श्रीरंग बोरकर, शरद बोरकर, शंकर बोरकर, रोहिदास बोरकर, मीरा बोरकर, सारिका बोरकर, सोनाली बोरकर आदी उपस्थित होते.
           
To Top