सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत जेष्ठ नेते स्वर्गीय माजी मंत्री अनंतरावजी थोपटे यांच्यासारखा महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात नेता होणे नाही.राजकीय कारकीर्दीत संघर्षमय जीवन जगत काँग्रेस पक्षाला योगदान देऊन दमदार फळी निर्माण करणारे तसेच भोर,वेल्ह्याच्या मावळी जनतेचा लोकनेता हरपल्याने राज्याच्या राजकारणात हळहळ व्यक्त होत आहे.काँग्रेसचे निष्ठावंत माजी मंत्री अनंतरावजी थोपटे साहेब यांचे नेतृत्व व कर्तृत्व महान असल्याने त्यांच्या कार्याला सलाम असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले.
माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन तसेच थोपटे साहेबांच्या तेराव्या विधीच्या शोकसभेत प्रदेशाध्यक्ष सपकाळ मंगळवार दि.१६ बोलत होते.यावेळी शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते देविदास बन्साळी,जिल्हाध्यक्ष श्रीरंग चव्हाण,सातारा जि.प.सदस्य उदय कबुले,जि.प.सदस्य विक्रम खुटवड, जि.बँक सदस्य भालचंद्र जगताप,पं.स.सभापती मनीषा कंक,सदस्य सुषमा चव्हाण,गीतांजली आंबवले,राजेश बोडके,माजी सभापती लहूनाना शेलार,नितीन भरगुडे,सचिन मांडके,समीर घोडेकर आदींसह तालुक्यातील सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते तसेच नागरिक हजारोंच्या संख्येत उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष सपकाळ पुढे बोलताना म्हणाले सोनिया गांधी यांच्याबरोबर ४ दशके काँग्रेस पक्षात निष्ठावंत राहून मराठमोळा,रांगडे बहुजन समाजाचे नेतृत्व,स्वतःसाठी कधीही न धावणारे निष्ठेने काँग्रेस पक्षात काम करणारा महाराष्ट्र राज्यातील नेता हरपला आहे.थोपटे साहेबांनी राजकारण बाजूला ठेवून कायमच समाजकारण करीत भोर विधानसभेचेच नव्हे तर विविध मंत्रिपदावर असताना राज्याच्या विकासाला हातभार लावला. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ व निष्ठावंत नेते म्हणून त्यांची राज्याच्या राजकारणात ओळख होती.त्यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षासह महाराष्ट्र राज्यातील राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.तर काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी साहेबांच्या निधनाची बातमी कळताच हळहळ व्यक्त केली.
मावळ्यांचे छत्र हरपले
भोर, वेल्ह्यातील जनतेच्या विकासाबरोबरच महाराष्ट्राच्या राजकारणात विकासभिमुख नेतृत्व स्वर्गीय माजी मंत्री अनंतरावजी थोपटे साहेब यांनी केले.थोपटे साहेबांच्या जाण्याने मार्गदर्शक कर्तुत्ववान निष्ठावंत नेता गमावला असून भोर,वेल्ह्याच्या मावळ्यांचे छत्र हरपले असे मत दुःखद अंतकरणाने आमदार दिलीप लांडे यांनी व्यक्त केले.
समाजहीत जपणारे नेते हरपले
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भोर,वेल्ह्याच्या भूमितील जनतेच्या विकासासाठी अहोरात्र झगडून विकास गंगा आणणारे माजी मंत्री अनंतरावजी थोपटे साहेब त्यांच्या जाण्याने समाजहित जपणारे नेते हरपले.सहकार क्षेत्रातील चिवट रत्न म्हणून त्यांची ओळख होती.समाजाच्या अंतकरणात कायम राहून त्यांनी समाजहित जपले असे ह.भ.प.भागवताचार्य बाळ महाराज गिरगावकर (परभणी) यांनी कीर्तनरुपी सेवेतून सांगितले.
