Baramati News l करंजेपूल चौकीतील प्रभारी अधिकाऱ्यावर कोणाचा वरदहस्त?; अवैध धंद्यांना अभय मिळत असल्याची परिसरात जोरदार चर्चा

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
 सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
 सोमेश्वरनगर परिसरातील अवैध धंद्यांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला असून करंजेपूल आउटपोस्ट चौकीतील प्रभारी अधिकाऱ्याच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. यापूर्वी या परिसरात कार्यरत असलेल्या शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी अवैध धंद्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवले होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून परिस्थिती बदलल्याचे चित्र दिसून येत असून विविध अवैध व्यवसायांना अभय मिळत असल्याची चर्चा परिसरात रंगू लागली आहे.
 वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या अखत्यारित येणाऱ्या करंजेपूल चौकीतील संबंधित प्रभारी अधिकारी यांचा बदली कालावधी पूर्ण झाल्यानंतरही त्यांना मुदतवाढ मिळाल्याची चर्चा सध्या नागरिकांमध्ये सुरू आहे. बदलीस पात्र असतानाही त्यांची नियुक्ती कायम कशी राहिली, यामागे कोणाचा राजकीय किंवा प्रशासकीय वरदहस्त आहे का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
 स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, परिसरात ऑनलाइन लॉटरी, मटका, जुगार आणि इतर काही बेकायदेशीर व्यवसाय पुन्हा डोके वर काढत आहेत. पूर्वी अशा प्रकारांना तात्काळ आळा घातला जात होता. मात्र सध्या संबंधित यंत्रणेकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याने अवैध धंदे चालविणाऱ्यांचे मनोबल वाढल्याची भावना व्यक्त होत आहे. काही ठिकाणी आर्थिक तडजोडी आणि हप्तेबाजीच्या चर्चाही दबक्या आवाजात सुरू असल्याचे नागरिक सांगत आहेत. याशिवाय, काही नागरिकांनी चौकीत कामानिमित्त गेले असता त्यांच्याशी अरेरावीची भाषा वापरणे, तक्रारी गांभीर्याने न घेणे आणि अपमानास्पद वर्तन केल्याच्या तक्रारीही केल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांना सन्मानाने वागणूक मिळण्याऐवजी त्यांना दडपशाहीचा अनुभव येत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. 
दरम्यान, या सर्व आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे, याची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी परिसरातून होत आहे. पोलीस विभागाची प्रतिमा जपण्यासाठी तसेच नागरिकांचा विश्वास कायम राखण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन वस्तुस्थिती समोर आणावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.करंजेपूल चौकीतील संबंधित अधिकाऱ्याविरोधातील चर्चांना आणि आरोपांना काही ठोस आधार आहे का, अवैध धंद्यांना खरोखरच अभय मिळत आहे का, तसेच मुदतवाढीमागील कारणे काय आहेत, याबाबत पुणे जिल्हा पोलीस प्रशासनाने स्पष्ट भूमिका घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
          आता पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करणार का, याकडे सोमेश्वरनगर परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या अनेक गावांमध्ये रात्री उशिरापर्यंत अवैध धंदे सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. विशेष म्हणजे शाळा व महाविद्यालयांच्या परिसरातही तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा आणि विविध व्यसनकारक वस्तू सहज उपलब्ध होत असल्याने पालक वर्ग चिंतेत आहे. तरुण पिढी ऑनलाईन मटका, बेटिंग आणि मोबाईल गेमिंगच्या आहारी जात असल्याचेही चित्र आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल यांनी जिल्ह्यात अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा दिला असला तरी बारामती तालुक्यात परिस्थिती फारशी बदललेली दिसत नसल्याची चर्चा आहे.

 कारवाईच्या नावाखाली किरकोळ धाडी टाकल्या जात असल्या तरी मुख्य सूत्रधारांवर कठोर कारवाई होत नसल्याने अवैध धंदेवाल्यांचे मनोबल वाढत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील सोमेश्वरनगर, निरा, वडगाव, कोऱ्हाळे परिसरात अवैध धंद्यांबाबत चर्चा वाढली आहे. काही नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पूर्वी शांत आणि कायदा-सुव्यवस्था राखणारा म्हणून ओळखला जाणारा हा परिसर आता अवैध व्यवसायांच्या विळख्यात अडकत चालला आहे. यासंदर्भात स्थानिक पोलिस यंत्रणेच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काही नागरिकांनी विशिष्ट अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली असून अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
To Top