सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुणे : प्रतिनिधी
पुण्यातील नाट्यरसिकांचे श्रद्धास्थान असलेल्या बालगंधर्व रंगमंदिरात मंगळवारी (दि. १६ जून) रात्री सादर करण्यात आलेल्या ‘सर्किट नाना लाईव्ह शो’ला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गर्दीमुळे हा प्रयोग हाऊसफुल ठरला असून ग्रामीण भागातील युवा कलाकारांच्या कलागुणांना पुणेकरांनी भरभरून दाद दिली.
सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे आलेल्या गावाकडील तरुणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. डिजिटल माध्यमांमध्ये लोकप्रियता मिळवल्यानंतर आता त्यांनी रंगभूमीवरही यशस्वी पदार्पण करत आपली छाप उमटवली आहे. नाटकाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बालगंधर्व रंगमंदिरात आठवड्याच्या मध्यावर, सुट्टीचा दिवस नसतानाही हाऊसफुल प्रयोग होणे हीच या कलाकारांच्या लोकप्रियतेची पावती मानली जात आहे.
गावाकडच्या मातीतून आलेल्या या तरुणांचा सोशल मीडियापासून व्यावसायिक रंगभूमीपर्यंतचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. आकाश भापकर यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत उभा केलेला ‘सर्किट नाना लाईव्ह शो’ सध्या महाराष्ट्रभर हास्याचा धुमाकूळ घालत असून प्रत्येक प्रयोगाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. बालगंधर्व रंगमंदिरातील नुकत्याच झालेल्या या प्रयोगाची चर्चा राज्यभर रंगू लागली आहे.
या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी सिनेसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांनी कलाकारांच्या अभिनयाचे आणि सादरीकरणाचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाची निर्मिती व दिग्दर्शन आकाश पांडुरंग भापकर यांनी केले असून लेखन सूरज रणदिवे यांचे आहे. नाट्यकलाकृतीमध्ये आकाश पांडुरंग भापकर यांनी मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. त्यांच्यासोबत स्वरूप भिलारे, राहुल काकडे, प्रतीक लकडे, अतुल कदम, सूरज रणदिवे, श्रावणी जगताप, कृष्णाली नेवसे आणि सुप्रिया तळेकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली.
ग्रामीण जीवनातील अनुभव, खुमासदार विनोद आणि सामाजिक वास्तव यांची सांगड घालणारा ‘सर्किट नाना लाईव्ह शो’ महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून आगामी काळातही या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
