Ashadhi wari l आळंदीत पूरस्थिती; असा होणार संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा : संस्थान कमिटीचा निर्णय

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
आळंदी : प्रतिनिधी
राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आळंदी येथील इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून शहरात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने यंदाचा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत समाधी मंदिरातच आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.
पूरामुळे आळंदीतील जनजीवन विस्कळीत झाले असून शहरातील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. नदीवरील पुलाचे कठडे व विजेचे खांब पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. नगरपरिषदेचे वॉटरहाऊस पाण्याखाली गेल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच दर्शनबारी, पालखी सोहळ्यासाठी उभारण्यात आलेली मोबाईल स्वच्छतागृहे आणि इतर तात्पुरत्या सुविधा पुरात वाहून गेल्या आहेत. शहरातील वीजपुरवठाही खंडित झाला असून तंबू व राहुट्यांच्या जागी मोठ्या प्रमाणात चिखल झाल्याने वारकऱ्यांच्या निवासाची व्यवस्था करणे अशक्य झाले आहे.
या पार्श्वभूमीवर आषाढीवारी पालखी सोहळा २०२६ चा प्रस्थान कार्यक्रम ८ जुलै २०२६ रोजी दुपारी ३ वाजता श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरातच मर्यादित उपस्थितीत पार पडणार आहे.
या सोहळ्यासाठी रथापुढील दिंडी क्रमांक १ ते २७ आणि रथामागील दिंडी क्रमांक १ ते २० मधील प्रत्येकी १० वारकरी, अशा ५६० वारकऱ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. याशिवाय दिंडीप्रमुख, मानकरी, सेवेकरी व प्रतिष्ठित अशा ५०० जणांना नारळप्रसादासाठी प्रवेश असेल. तसेच खांदेकरी, कर्मचारी, आरोग्य, स्वच्छता विभाग आणि पोलीस प्रशासनातील ६६० अधिकारी-कर्मचाऱ्यांसह एकूण १,७२० व्यक्तींच्या उपस्थितीत प्रस्थान सोहळा संपन्न होणार आहे.

संस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ रामचंद्र देखणे आणि पालखी सोहळा प्रमुख ॲड. राजेंद्र बाबुराव उमाप यांनी सर्व वारकरी भाविकांना आवाहन केले आहे की, आळंदीतील पूरस्थिती आणि प्रतिकूल हवामान लक्षात घेता पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदीला येऊ नये. परिस्थिती सामान्य झाल्यानंतर पुढील मुक्कामाच्या ठिकाणी पालखी सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
To Top