सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : सोमनाथ साखरे
केळघर घाट परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने केळघर घाटात मुकवली मुरा येथे रस्त्यावर अचानक दरड कोसळल्याने वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. यामुळे पर्यटक आणि चारमान्यांचे प्रवासात प्रचंड हाल झाले आहेत.
घाटातील रस्ता निसरडा आणि धोकादायक झाल्याने सध्या छोट्या वाहनांना प्रवास करणे अत्यंत जोखमीचे बनले असून या मुसळधार पावसाचा मोठा फटका येथील स्थानिक नागरिकांना बसला असून मुकवली मुरा येथील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
रस्त्याच्या बाजूला पाण्याचा निचरा होण्यासाठी नाले सफाई नसल्याने पावसाचे सर्व पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत असल्याने रस्ता खचण्याची भीती आहे.
केळघर घाटात डोंगराचा भाग कमकुवत झाला असून, दरडी कोसळण्याचा धोका सतत निर्माण होत आहे. प्रशासनाने तातडीने यावर उपाययोजना करून घाट रस्ता सुरक्षित करावा अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
