Ashadiwari Palkhi Sohala I संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा : १० ते १५ जुलैदरम्यान पुणे ग्रामीणमध्ये वाहतुकीत मोठे बदल

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
पुणे : प्रतिनिधी 
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २०२६ निमित्त १० ते १५ जुलैदरम्यान पुणे ग्रामीण जिल्ह्यातील विविध मार्गांवरील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. पालखी सोहळ्यात सुमारे ७ ते ८ लाख वारकरी सहभागी होणार असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि पालखी सोहळा सुरळीत पार पडावा यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी मोटार वाहन कायदा, १९८८ मधील तरतुदीनुसार वाहतुकीसंदर्भातील आदेश जारी केले आहेत.

यंदाच्या पालखी सोहळ्यानुसार १३ जुलै रोजी जेजुरी, १४ जुलै रोजी वाल्हा आणि १५ जुलै रोजी निरा येथे पालखीचा मुक्काम असणार आहे. या पार्श्वभूमीवर पुणे–पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग (क्र. ९६५) तसेच जेजुरी, सासवड, मोरगाव, सुपा, बेलसर, निरा, पारगाव मेमाणे, भोरवाडी, जेऊर फाटा आणि लोणंद परिसरातील अनेक मार्गांवर वाहतूक टप्प्याटप्प्याने बंद ठेवून पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

पुणे, सातारा, फलटण, लोणंद, बारामती, उरुळी कांचन आणि सासवड या दिशेने जाणाऱ्या वाहनांना विविध कालावधीत पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे. पालखी सोहळ्यातील दिंड्यांची वाहने व अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त इतर सर्वसामान्य वाहनांवर संबंधित मार्गांवर निर्बंध लागू राहतील.

जिल्हा प्रशासनाने नागरिकांना पालखी मार्गावरील अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले असून, प्रवासापूर्वी वाहतुकीची माहिती घेऊन पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे तसेच वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.
To Top