सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
साखरवाडी : गणेश पवार
फलटण तालुक्यातील खामगाव येथे बुधवारी पहाटे घडलेल्या अत्यंत दुर्दैवी घटनेत विजेचा शॉक लागून एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव येथील खाजगी इंग्लिश मीडियम स्कूलच्या शेजारी राहणाऱ्या शिंदे कुटुंबावर काळाने घाला घातला. बुधवारी सकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडलेल्या विद्युत वायरमध्ये प्रवाह आल्याने प्रथम सतीश उर्फ पिसुरड्या किसन शिंदे(वय४८) यांना विजेचा शॉक लागला. त्यांना वाचविण्यासाठी धावलेल्या गंगुबाई पिसुरड्या शिंदे(वय४६), सचिन पिसुरड्या शिंदे(वय २६) आणि आरती पिसुरड्या शिंदे(वय २२) यांनाही विजेचा जोरदार धक्का बसला.
एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात चौघेही विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवा महादेव पिसे, ओंबासे व अडसूळ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी फलटण उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली, विद्युत प्रवाह घराबाहेरील वायरमध्ये कसा आला आणि त्यामागील कारण काय, याचा तपास फलटण ग्रामीण पोलीस करीत आहेत.एकाच कुटुंबातील चार जणांचा अशा दुर्दैवी घटनेत मृत्यू झाल्याने खामगावसह संपूर्ण फलटण तालुक्यात शोककळा पसरली असून नागरिकांकडून शिंदे कुटुंबीयांप्रती तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
