सोमेश्वर रिपोर्टर टीम----
बारामती : प्रतिनिधी
बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीतील खुनाचा प्रयत्न प्रकरणातील सुमारे चार महिन्यांपासून फरार असलेला आरोपी श्याम विलास सकट याला बारामती शहर पोलिसांनी विशेष कोंबिंग ऑपरेशनदरम्यान आमराई परिसरातून अटक केली. आरोपीविरुद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
५ मार्च २०२६ रोजी इंदापूर चौकातील हॉटेल गोकुळ येथे आशिष प्रदीप केकाण यांच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात त्यांना गंभीर दुखापत झाली होती. तपासादरम्यान एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेला कोयता जप्त करण्यात आला होता.
मुख्य आरोपी श्याम सकट हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध ठिकाणी शोधमोहीम, नातेवाईकांकडे चौकशी तसेच न्यायालयामार्फत जाहीरनाम्याची कारवाई केली होती. मात्र आरोपी पोलिसांना चकवा देत होता.
१० जुलै रोजी आमराई परिसरात राबविण्यात आलेल्या विशेष कोंबिंग ऑपरेशनमध्ये गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्याची येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम आणि पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप भंडारे व त्यांच्या पथकाने केली. आरोपीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
