सोमेश्वर रिपोर्टर टीम----
इंदापूर : संतोष माने
राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे समजले जाणारे उजनी धरण रविवारी 50 टक्के भरले असून, त्यामुळे पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शेतीसाठी वरदायिनी ठरणाऱ्या या धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्याने पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.
उजनी धरणाची निर्मिती सोलापूर जिल्ह्यात असली, तरी त्याचे संपूर्ण पाणलोट क्षेत्र इंदापूर तालुक्यात आहे. आज सकाळी दौंड येथून धरणात 8,177 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. मात्र, वरच्या धरण क्षेत्रात पावसाने उघडीप दिल्याने येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात घट झाली आहे.
गेल्या वर्षी याच दिवशी उजनी धरण 89.30 टक्के भरले होते. यंदा मात्र पावसाचे आगमन उशिरा झाले. त्यातच चार दिवसांपूर्वी पुणे शहर आणि वरच्या धरण क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतल्याने धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी झाले. तरीही उणे पातळीत गेलेले धरण आता 50 टक्क्यांपर्यंत पोहोचल्याने परिसरातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
सध्या उजनी धरणात 26.54 टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध असून, पुढील काळात वरच्या भागात चांगला पाऊस झाल्यास धरणातील साठ्यात आणखी वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
