सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाणेवाडी येथे पोलीसांशी संबंध असल्याचे खोटे भासवून एका किराणा दुकानदाराकडून १२ हजार रुपये खंडणी उकळल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत विजय हिंदुराव साळुंखे (वय ३६, रा. वाघळवाडी, ता. बारामती) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार विनोद नामदास (रा. विकासनगर, वाणेवाडी, ता. बारामती) याच्याविरुद्ध वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ जुलै २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान तसेच २० जुलै रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास हरणाई चौक, वाणेवाडी येथील विजय किराणा स्टोअर्समध्ये ही घटना घडली. आरोपीने स्वतःचा पोलीसांशी संबंध असल्याचे भासवून फिर्यादीविरुद्ध करंजेपूल पोलीस दूरक्षेत्रात अल्पवयीन मुलीवरील बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटक होईल, अशी खोटी भीती दाखवली. या भीतीपोटी फिर्यादीकडून १२ हजार रुपये खंडणी स्वरूपात उकळल्याचा आरोप आहे.
याशिवाय आरोपीने पुन्हा पैशांची मागणी करत धमकावून आणखी खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक वारुळे करीत आहेत.
