सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
माळशिरस : प्रतिनिधी
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने मोठी कारवाई करत नातेपुते ते शिंगणापूर पाटी या मार्गावर २० पुरुष व २१ महिला अशा एकूण ४१ संशयित खिसेकापू व मोबाईल चोरांना ताब्यात घेतले आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी वारीतील दिंडीसह इतर वाहनचालकांना वाहने रस्त्यावर किंवा वाहतुकीस अडथळा होईल अशा ठिकाणी उभी करू नयेत, असे आवाहन केले आहे. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जी. बी. जगताप, पोलिस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
यंदा प्रथमच ५G तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून त्यामुळे विविध विभागांतील अधिकारी एकाच नेटवर्कद्वारे जोडले गेल्याने माहितीची देवाणघेवाण अधिक वेगाने होत आहे. रिंगण व मुक्कामस्थळी नियंत्रणासाठी पोलिस मदत केंद्रे आणि वॉच टॉवर उभारण्यात आले आहेत.
पालखी सोहळ्याची अद्ययावत माहिती नागरिकांनी sp.solapur.gov.in या संकेतस्थळावरून घ्यावी, असे प्रशासनाने सांगितले आहे. तसेच वारीत वाहनांची संख्या वाढल्याने वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी काही मार्गांमध्ये बदल करण्यात आला असून, वारकऱ्यांनी व नागरिकांनी खिसेकापू व मोबाईल चोरांपासून सतर्क राहण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे
