Baramati Crime l १३ वर्षीय शाळकरी मुलीच्या अपहरणाचा डाव फसला : चार अज्ञातांविरोधात पोलिसांत गुन्हा

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
वडगाव निंबाळकर : प्रतिनिधी
लोणीभापकर (ता. बारामती) येथे शाळेत सायकलवरून जात असलेल्या १३ वर्षीय विद्यार्थिनीला जबरदस्तीने चारचाकी वाहनात बसवून पळवून नेण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात चार अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २० जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास संबंधित विद्यार्थिनी सायकलवरून शाळेकडे जात होती. त्यावेळी लोणीभापकर येथील दत्त मंदिराजवळ रस्त्यावर उभी असलेल्या राखाडी रंगाच्या मारुती इको वाहनातील चार अनोळखी इसमांपैकी दोघांनी तिची सायकल अडवली. त्यानंतर तिला जबरदस्तीने वाहनात बसवून घेऊन जाण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
या घटनेप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास प्रभारी अधिकारी एपीआय जीवन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक भाऊसाहेब मारकड करीत आहेत.
दरम्यान, या घटनेतील संशयित व्यक्ती किंवा राखाडी रंगाच्या मारुती इको वाहनाबाबत कोणाकडेही माहिती असल्यास त्यांनी तात्काळ वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले असून माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
To Top