सोमेश्वर रिपोर्टर टीम----
बारामती : प्रतिनिधी
बारामती शहर परिसरात नामांकित कंपनीच्या नावाने बनावट सिगारेटची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या रॅकेटचा बारामती शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. श्रीराम नगर परिसरात करण्यात आलेल्या कारवाईत पोलिसांनी सुमारे ११ लाख ३२ हजार रुपये किमतीचा बनावट सिगारेटचा साठा आणि टाटा कॅरी पिकअप टेम्पो जप्त केला आहे.
याप्रकरणी 'अन्वेष आयपीआर सर्व्हिसेस' चे डेप्युटी मॅनेजर योगेश वेदानंदसिंग तोमर यांच्या फिर्यादीवरून चार जणांविरुद्ध कॉपीराईट अधिनियम, १९५७ मधील कलम ५१ व ६३ अन्वये बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींमध्ये हुजेब फिरोज बागवान (रा. यादगार सिटी, हरीकृपानगर, बारामती), रयान अयुब खान (रा. हरीकृपानगर, इंदापूर रोड, बारामती), जाकीर अल्लाउद्दीन शेख (रा. अंधेरी रेल्वे स्टेशन परिसर, मुंबई) आणि पप्पू निषाद (रा. महादेव मळा, बारामती) यांचा समावेश आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे छापा
दि. २९ जुलै २०२६ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास श्रीराम नगर परिसरात टाटा कॅरी पिकअप (क्र. एमएच ४२ ए.क्यू. ६६१७) मधून नामांकित कंपनीच्या नावाने बनावट सिगारेटची वाहतूक व विक्री होत असल्याची गोपनीय माहिती बारामती शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तक्रारदार व पंचांसमवेत घटनास्थळी धाव घेत संबंधित वाहन ताब्यात घेतले.
वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये 'गोल्ड फ्लेक' कंपनीच्या नावाचे बनावट सिगारेटचे बॉक्स आढळून आले. तपासादरम्यान हे बॉक्स बनावट असल्याचे स्पष्ट झाले.
११.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त
या कारवाईत पोलिसांनी गोल्ड फ्लेक रेड सिगारेटचे ५० बॉक्स (किंमत २ लाख ४० हजार ३ रुपये), गोल्ड लाईट सिगारेटचे १३० बॉक्स (किंमत ४ लाख ४२ हजार रुपये) तसेच ४ लाख ५० हजार रुपये किमतीचा टाटा कॅरी पिकअप असा एकूण ११ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
मुंबईहून होत होता बनावट मालाचा पुरवठा
चालक हुजेब बागवान याच्याकडे चौकशी केली असता, हा माल रयान अयुब खान व जाकीर अल्लाउद्दीन शेख यांच्याकडून मिळाल्याचे तसेच पप्पू निषाद यांच्या टेम्पोतून बारामतीत आणण्यात आल्याची माहिती समोर आली. तपासात हा बनावट माल मुंबईतील अंधेरी परिसरातून पुरवला जात असल्याचेही उघड झाले आहे.
ही कारवाई बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार ज्ञानदेव क्षीरसागर, पोलीस हवालदार साबळे यांच्या पथकाने केली असून, पुढील तपास पोलीस हवालदार यशवंत ज्ञानदेव पवार करत आहेत.
