सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती येथील डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव (रावे) कार्यक्रमांतर्गत कृषिदूतांचे सदोबाचीवाडी येथे आगमन झाले. पुढील चार महिने हे विद्यार्थी गावात वास्तव्यास राहून शेतकरी बांधवांना आधुनिक शेती, पीक व्यवस्थापन, मृदा आरोग्य, कीड व रोग नियंत्रण तसेच विविध कृषी तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करणार आहेत.
ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती संचलित व महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयाच्या चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमात सहभाग आहे.
कृषी, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात प्रगत तसेच विविध सोयी-सुविधांनी युक्त असल्यामुळे सदोबाचीवाडी गावाची या कार्यक्रमासाठी निवड करण्यात आली आहे.
कृषिदूतांच्या स्वागतप्रसंगी सरपंच सौ. मनिषा आनंदकुमार होळकर, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांनी कृषिदूतांचे उत्स्फूर्त स्वागत करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या उपक्रमात देवदत्त पुरंदरे, निखिल नाळे, ईश्वर कुंभार, निमिश हिंगणे, तेजस वाबळे, राहुल अकिवाटे, ऋषी पाठक आणि अनिकेत कावळे हे कृषिदूत सहभागी झाले आहेत. कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. पी. गायकवाड, प्रा. एस. व्ही. बुरुंगले तसेच महाविद्यालयातील इतर प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली हे विद्यार्थी गावात विविध कृषी प्रात्यक्षिके, शेतभेटी, जनजागृती उपक्रम आणि शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम राबविणार आहेत.
या उपक्रमामुळे सदोबाचीवाडीतील शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती मिळून शेती उत्पादनवाढीस चालना मिळेल तसेच शाश्वत शेती पद्धतींचा प्रसार होण्यास मदत होईल, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामपंचायत सदोबाचीवाडीच्या वतीने कृषिदूतांचा आकर्षक भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. हा स्वागत समारंभ ३० जून रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत उत्साहात पार पडला.
