Baramati News l माती परीक्षणातून समृद्ध शेतीकडे वाटचाल; बारामतीच्या कृषिकन्यांचा उपक्रम

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी 
ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत बारामती येथील कृषिकन्यांनी वडगाव निंबाळकर येथे शेतकऱ्यांसाठी माती परीक्षणाचा उपक्रम राबवून वैज्ञानिक शेतीचा संदेश दिला. या उपक्रमात कृषिकन्या भाग्यश्री गायकवाड, वेदांतिका चव्हाण, स्वाती ढवणे, ऋषिता गावित, श्रुती घुले, आकांक्षा जराड, देविका कांबळे आणि दीक्षा शेळकंदे यांनी सहभाग घेतला.
उपक्रमादरम्यान शेतकरी मंगेश पानसरे व गणेश पानसरे यांच्या शेतातील मातीचे नमुने शास्त्रोक्त पद्धतीने संकलित करण्यात आले. तसेच माती परीक्षणाचे महत्त्व, मातीचे नमुने योग्य पद्धतीने घेण्याची प्रक्रिया, परीक्षण अहवालाचा उपयोग आणि त्यानुसार संतुलित खत व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी कृषिकन्यांनी माती परीक्षणामुळे जमिनीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता समजते, खतांचा योग्य प्रमाणात वापर करता येतो, उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होते आणि पिकांची उत्पादकता वाढते, अशी माहिती दिली. शेतकऱ्यांनी नियमित माती परीक्षण करून वैज्ञानिक पद्धतीने शेती करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
उपक्रमाचे शेतकरी मंगेश पानसरे व गणेश पानसरे यांनी स्वागत करत कृषिकन्यांच्या मार्गदर्शनाचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे शेतकऱ्यांना आधुनिक व शास्त्रीय शेतीविषयक माहिती मिळून शेती अधिक परिणामकारक करण्यास मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले.
To Top