सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
फलटण : गणेश पवार
फलटण तालुक्यातील होळ येथे दूध भेसळीच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासनाने रविवारी (दि. १२) सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास धडक कारवाई करत संशयित मंगल दिलीप भोसले व कुणाल दिलीप भोसले यांच्या गोठ्यावर छापा टाकला. या कारवाईत बनावट दूध तयार करण्यासाठी वापरले जात असल्याचा संशय असलेले साहित्य तसेच मिक्सर जप्त करण्यात आला.
सहआयुक्त तुषार शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती रुपाली खापणे, इम्रान हवालदार आणि ऋतुजा चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली. छाप्यादरम्यान गोठ्यातून सुमारे ४ किलो औद्योगिक वापरासाठी असलेली व्हे पावडर (SNF वाढीसाठी वापरली जाणारी), ३ किलो नॉन-डेअरी क्रीम पावडर तसेच हे साहित्य एकत्रित करण्यासाठी वापरला जाणारा मिक्सर जप्त करण्यात आला.
या कारवाईस फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचेही सहकार्य लाभले. महिला पोलीस उपनिरीक्षक ज्योती चव्हाण, पोलीस हवालदार महादेव पिसे, अमोल पवार, पोलीस कॉन्स्टेबल सूरज काकडे, श्रीकांत खरात, कल्पेश काशीद तसेच महिला पोलीस कॉन्स्टेबल अश्विनी साळुंखे यांनी बंदोबस्ताची जबाबदारी पार पाडली. जप्त करण्यात आलेल्या साहित्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असून अहवालानंतर संबंधितांवर अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत पुढील कायदेशीर कारवाई करण्यासाठी फलटण ग्रामीण पोलिसांनी संशयतांचा ताबा घेतला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया फलटण ग्रामीण पोलीस स्थानकात सुरू आहे.
चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. जप्त केलेली पावडर आणि पाणी गाईच्या दुधात मिसळून भेसळयुक्त दूध तयार केले जात होते. हे कृत्रिम दूध बारामती तालुक्यातील होळ येथील सोमनाथ डेअरीला पुरवले जात असल्याचे उघड झाले आहे. तसेच, कृत्रिम दूध बनवण्यासाठी लागणारी पावडर नीरा येथील एका व्यक्तीकडून पुरवली जात असल्याची माहितीही तपासात निष्पन्न झाली आहे. या भेसळयुक्त दूध पुरवठा साखळीत आणखी काही व्यक्तींचा सहभाग असल्याचा संशय आहे.
कृत्रिम दूध निर्मिती आणि पुरवठा करून नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण केल्याप्रकरणी मंगल भोसले, दिलीप भोसले, कुणाल भोसले, नीरा येथील संशयित पुरवठादार मोरे आणि सोमनाथ डेअरीचे जबाबदार संचालक किंवा मालक यांच्यावर फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अन्न सुरक्षा व मानके अधिनियम आणि अन्य संबंधित कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक शिवानी नागवडे करत आहेत.
