सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा अतिवापर टाळून विषमुक्त अन्नधान्य, फळे आणि भाजीपाल्याचे उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचा अवलंब करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पंचायत समितीचे सभापती किरण तावरे यांनी केले. नागरिकांनीही विषमुक्त फळे व भाजीपाला थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करून सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त १ जुलै रोजी पंचायत समिती, बारामती येथे कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपसभापती शुभांगी आगवणे, गटनेते बाबा चोरमले, सदस्य नितीन काकडे, उज्ज्वला खैरे, आशा वायाळ, उपविभागीय कृषी अधिकारी रश्मी जोशी, गटविकास अधिकारी किशोर माने, तालुका कृषी अधिकारी सचिन हाके, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. धीरज शिंदे, विषय विशेषज्ञ संतोष करंजे, शेतकरी सन्मान समितीचे अध्यक्ष अशोक तावरे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात तालुक्यातील सूर्यफूल, बाजरी व सोयाबीन पिकांच्या राज्यस्तरीय व तालुकास्तरीय पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कऱ्हाटी येथील शेतकरी नारायण बाबा लोणकर यांनी सूर्यफूल पीक स्पर्धेत राज्यस्तरीय प्रथम क्रमांक मिळवत ₹५० हजारांचे पारितोषिक पटकावल्याबद्दल त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. यावेळी त्यांनी आपल्या यशाचा अनुभव उपस्थितांसमोर मांडला.
गटनेते बाबा चोरमले यांनी बदलत्या हवामानाचा अभ्यास करून शेतीचे नियोजन करण्याचे आवाहन केले. कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार पीक नियोजन केल्यास शेतकऱ्यांना अधिक फायदा होईल, असे त्यांनी सांगितले.
गटविकास अधिकारी किशोर माने यांनी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतकरी उत्पादक गट स्थापन करावेत व केंद्र तसेच राज्य शासनाच्या विविध योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
तालुका कृषी अधिकारी सचिन हाके यांनी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. हवामान बदलामुळे होणारे नुकसान लक्षात घेता फळपिकांचा विमा काढण्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले. त्यातून नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण मिळेल, असे त्यांनी सांगितले.
