सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सुपे : दीपक जाधव
बारामती तालुक्यातील सुपे येथील विद्या प्रतिष्ठान संचलित नूतन महाविद्यालयीन इमारतीची पाहणी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शुक्रवारी केली. यावेळी त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या विविध उपक्रमांची माहिती घेतली.
विशेष म्हणजे, एका विद्यार्थिनीसोबत बुद्धिबळाचा डाव खेळत त्यांनी अवघ्या दुसऱ्याच चालीत डाव आपल्या बाजूने फिरवला आणि उपस्थितांमध्ये एकच कौतुकाची चर्चा रंगली.
सुपे परिसरातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे या उद्देशाने विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या नव्या महाविद्यालयीन इमारतीची पवार यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित ठेकेदाराकडून बांधकामाच्या प्रगतीची माहिती घेतली. डिसेंबरअखेरपर्यंत इमारतीचे काम पूर्ण होईल, अशी माहिती ठेकेदाराने दिली.
यानंतर पवार यांनी न्यु इंग्लिश स्कूलला भेट देत शाळेतील शैक्षणिक उपक्रमांची पाहणी केली. शाळेच्या भिंतींवर विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेले बोलके शैक्षणिक साहित्य, तसेच 'टाकाऊतून टिकाऊ' संकल्पनेवर आधारित विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंची त्यांनी माहिती घेतली.
विद्यार्थ्यांनी बाराखडी तक्ता, रांगोळीच्या माध्यमातून शिकविण्यात येणारे उपक्रम, विविध शैक्षणिक प्रयोग आणि कौशल्याधारित शिक्षणाची माहिती पवार यांना दिली. याचवेळी एक विद्यार्थिनी बुद्धिबळाचा पट घेऊन आली. तिच्याशी संवाद साधत पवार यांनी बुद्धिबळाचा डाव खेळला. मात्र विद्यार्थिनी काही समजून घेण्यापूर्वीच पवार यांनी दुसऱ्याच चालीत डाव जिंकत आपल्या बुद्धिमत्तेची झलक दाखवली. हा प्रसंग उपस्थित शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवरांसाठी विशेष आकर्षण ठरला.
येथील संस्थेत नर्सरी ते इयत्ता बारावीपर्यंत सुमारे १,४५० विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची माहिती प्राचार्य योगेश पाटील यांनी दिली. तर महाविद्यालयाच्या तीनही शाखांमध्ये सुमारे ५५० विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची माहिती प्राचार्य डॉ. संजय काळे यांनी दिली. यावेळी संस्थेचे सदस्य मंदार सिकची, रजिस्ट्रार श्रीष कंबोज, शंकरराव चांदगुडे, शौकत कोतवाल, पोपटराव पानसरे, संजय पोमण, दत्तात्रय कदम, मंडळ अधिकारी हंसराज मनाले, तलाठी निलेश गद्रे आदी उपस्थित होते.
