Baramati News l मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुप्यातील विद्यार्थिनीचा गौरव

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सुपे : दीपक जाधव 
 बारामती तालुक्यातील सुपे येथील हर्ष कॉम्प्युटरच्या विद्यार्थिनी भाग्यश्री मनोहर इंगळे हिचा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. पुणे येथे छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) यांच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा गणेश कला क्रीडा मंच येथे उत्साहात पार पडला. यावेळी सारथीच्या सीएसएमएस डीप स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रमात उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल भाग्यश्री इंगळे हिचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील तसेच विविध मान्यवर उपस्थित होते. एमकेसीएलचे आरसीयू समन्वयक विश्वजीत उत्तरवार यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी, कौशल्य विकास आणि सातत्य यांचे महत्त्व सांगत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

सुपे येथील हर्ष कॉम्प्युटरचे संस्थापक मिलिंद पोमणे व सविता मिलिंद पोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली सारथीच्या सीएसएमएस डीप कोर्सचे यशस्वी संचालन केले जात आहे. आतापर्यंत या कोर्सद्वारे ९५ विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले असून, त्यापैकी १२ विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत यश मिळवून रोजगाराच्या संधी प्राप्त केल्या आहेत.

भाग्यश्री इंगळेच्या या यशामुळे सुपे परिसरात आनंदाचे वातावरण असून तिच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे
To Top