सोमेश्वर रिपोर्टर टीम----
पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी
मोशी कचरा डेपो येथे ८ जुलै रोजी झालेल्या भीषण दुर्घटनेतील चौथ्या दिवशीच्या शोधमोहीमेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या वामन कसबे (वय ५०, मोशी) यांचा मृतदेह मध्यरात्री सापडला. त्यांना तत्काळ यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या ९ वर पोहोचली असून सर्व बेपत्ता नागरिकांचा शोध पूर्ण झाल्याने तब्बल ८४ तास चाललेले बचावकार्य मध्यरात्री २ वाजता थांबविण्यात आले.
८ जुलै रोजी दुपारी साडेएकच्या सुमारास मोशी येथील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा प्रचंड ढीग कोसळल्याने ही दुर्घटना घडली. घटनेनंतर पाच जणांनी स्वतःची सुटका केली होती. उर्वरित नागरिकांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ, भारतीय सेना, पिंपरी-चिंचवड महापालिका, पीएमआरडीए अग्निशमन दल, पोलीस आणि इतर यंत्रणांनी संयुक्तपणे बचावमोहीम सुरू केली.
बचाव पथकाने १८ अडकलेल्या नागरिकांपैकी ९ जणांना जिवंत बाहेर काढण्यात यश मिळवले. मात्र, इमारतीच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या भावेश वाणी यांचा ९ जुलै रोजी मृत्यू झाला. त्यानंतर चौथ्या दिवशी अक्षय सावंत (३५), सुनील कोरके (४०), सन्नी माने (३९), महेश कुंभार (३३), नागेश गायकवाड (२६), रणजीत पाटील (२२) आणि राहुल गायकवाड (३४) यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर इमारतीशेजारील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या वामन कसबे यांचाही मृतदेह सापडल्याने मृतांचा आकडा ९ वर पोहोचला.
दुर्घटनाग्रस्त इमारतीत प्रवेश करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. इमारत अस्थिर असल्याने ती कोसळू नये यासाठी खबरदारी घेत दोन अत्याधुनिक डिमोलिशन एक्सकॅव्हेटरच्या सहाय्याने वरचा काँक्रीटचा भाग हटवून बचाव पथकाने आत प्रवेश केला. तसेच ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफच्या श्वान पथकाचीही मदत घेण्यात आली. महापौर रवि लांडगे यांनी या दुर्घटनेला अत्यंत वेदनादायी संबोधत मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. "प्रत्येक जीव वाचविण्यासाठी सर्व यंत्रणांनी रात्रंदिवस अथक प्रयत्न केले. मात्र नियतीपुढे सर्व प्रयत्न अपुरे ठरले. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत," असे त्यांनी म्हटले.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनीही ८४ तास अखंड सुरू असलेल्या बचावमोहीमेचे कौतुक करत, "९ नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले; मात्र ९ जणांचा मृत्यू अत्यंत दुःखद आहे. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात महापालिका सहभागी आहे," अशी भावना व्यक्त केली.
