मोठी बातमी | राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचे निधन : पुणे जिल्ह्यावर शोककळा

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
सासवड : प्रतिनिधी 
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर सोपानराव कामठे (वय ६३, रा. कोंढवा बुद्रुक, पुणे) यांचे आज, बुधवारी दुपारी सुमारे बारा वाजण्याच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने पुणे जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जालिंदर कामठे हे दररोज नियमितपणे मॉर्निंग वॉकसाठी जात असत. मात्र आज सकाळी अकरा वाजेपर्यंत ते बाहेर न आल्याने घरच्यांना संशय आला. त्यांच्या खोलीचा दरवाजा आतून बंद असल्याने नातेवाईकांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी ते बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. यानंतर त्यांना तातडीने जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
जालिंदर कामठे यांनी पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदासह विविध जबाबदाऱ्या सांभाळत जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. त्यांच्या निधनामुळे पुणे जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाल्याची भावना अनेक नेते व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे, अवघ्या तीन महिन्यांपूर्वीच त्यांच्या मातोश्री हौसाबाई कामठे यांचे निधन झाले होते. त्या दुःखातून कामठे कुटुंब सावरत असतानाच जालिंदर कामठे यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.

जालिंदर कामठे यांच्या निधनाची वार्ता समजताच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिकांनी हळहळ व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
To Top