Jawali News l सुट्टीवर आलेले जवान तुषार भिलारे यांचे अपघाती निधन : लान्स नायक म्हणून कार्यरत; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
मेढा : सोमनाथ साखरे
जावली तालुक्यातील पवारवाडी येथील जवान तुषार राजेंद्र भिलारे (वय ३४) यांचे सुट्टीवर असताना झालेल्या अपघातानंतर उपचारादरम्यान मंगळवारी (दि. ३०) निधन झाले. त्यांच्या निधनामुळे पवारवाडीसह संपूर्ण पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.
तुषार भिलारे हे भारतीय सैन्यात लान्स नायक पदावर कार्यरत होते. ते मध्यप्रदेशातील महू येथे एमसीटीई (कॉर्प्स ऑफ सिग्नल्स) युनिटमध्ये सेवा बजावत होते. दीड महिन्यांपूर्वी ते रजेवर गावी आले असताना झाडावरून पडून गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना पुण्यातील कमांड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, सुमारे महिनाभर उपचार सुरू असतानाही मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली.
भिलारे हे २०१० मध्ये भारतीय सैन्यात भरती झाले होते. फेब्रुवारी २०२७ मध्ये ते सेवानिवृत्त होणार होते. मात्र, त्यापूर्वीच अपघातामुळे त्यांचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई आणि वडील असा परिवार आहे. त्यांच्यावर आज (बुधवार, दि. १ जुलै) सकाळी सुमारे ११ वाजता पवारवाडी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
To Top