सोमेश्वर रिपोर्टर टीम----
भोर : संतोष म्हस्के
नीरा खोऱ्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे नीरा नदी प्रणालीतील धरणांच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. मंगळवारी सकाळपर्यंत नीरा प्रणालीतील एकूण धरणसाठा ६८ टक्क्यांवर पोहोचला असून, प्रमुख वीर धरणातील पाणीसाठ्याने ६७ टक्क्यांचा टप्पा ओलांडला आहे. भाटघर धरणक्षेत्रात तब्बेत ९३३ मिमी पावसाची नोंद झाली असून भाटघर धरण ३५ टक्के भरले आहे. नीरा देगघर धरणक्षेत्रात ७५२ मिमी पावसाची नोंद झाली असून धरण ४५.६० टक्के भरले आहे. तर गुंजवणी धरणक्षेत्रात ७३२ मिमी पावसाची नोंद झाली असून धरण ४०.८० टक्के भरले आहे.
त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.वरच्या धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भाटघर, नीरा देवघर, गुंजवणी आणि वीर या धरणांमध्ये सातत्याने पाण्याची आवक वाढत आहे. परिणामी, जलसाठ्यात दिवसागणिक वाढ होत असून सिंचनासह पिण्याच्या पाण्याची चिंता काही प्रमाणात कमी झाली आहे.
हवामान विभागाने पुढील काही दिवसही घाटमाथा आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे धरणांतील पाणीसाठा आणखी वाढण्याची शक्यता असून, आवश्यकतेनुसार धरणांतून पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो.
दरम्यान, प्रशासनाने नदीकाठच्या आणि सखल भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. धरणातून विसर्ग सुरू झाल्यास नदीपात्रात जाणे टाळावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
