सोमेश्वर रिपोर्टर टीम----
बारामती : प्रतिनिधी
बारामती वकील संघटनेच्या सन २०२६–२०२७ या कार्यकाळासाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, ग्रंथपाल, खजिनदार व महिला प्रतिनिधी या पदांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली होती.
अध्यक्षपदासाठी अॅड. सचिन सुधाकर वाघ, अॅड. सुप्रिया ज्ञानदेव काकडे, अॅड. अविनाश वामनराव गायकवाड यांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते. अर्ज दाखल करण्याच्या अंतिम टप्प्यात अॅड. अभिजित संभाजीराव जगताप यांनीही अर्ज दाखल केल्याने निवडणुकीत चांगलीच रंगत निर्माण झाली होती. निवडणूक होणार की अध्यक्ष बिनविरोध निवडला जाणार, याकडे वकील वर्तुळाचे लक्ष लागले होते.
मात्र अर्ज माघारीच्या दिवशी अॅड. सुप्रिया काकडे, अॅड. अविनाश गायकवाड आणि अॅड. अभिजित जगताप यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेत अॅड. सचिन वाघ यांना जाहीर पाठिंबा दिल्याने सचिन वाघ यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
अॅड. सचिन वाघ हे गेली वीस वर्षे वकिली व्यवसायात कार्यरत असून नामांकित विधिज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या प्रेमळ, मनमिळावू स्वभावामुळे आणि सर्व वकील बंधूंशी सातत्याने संपर्क ठेवण्याच्या कार्यपद्धतीमुळे त्यांना संघटनेत व्यापक पाठिंबा लाभला आहे. नामनिर्देशन अर्ज दाखल करतानाही मोठ्या संख्येने वकील बंधू उपस्थित राहून त्यांना पाठिंबा दर्शविला होता. तसेच ते बारामती ट्रेकर्स क्लबचे अध्यक्ष असून विविध गिरिभ्रमण मोहिमा आयोजित करतात. बारामतीमध्ये वाचन संस्कृती व साहित्य चळवळीला चालना देण्यासाठी ‘साहित्य कट्टा’सारख्या उपक्रमांतही ते सक्रियपणे पुढाकार घेत असतात.
बिनविरोध निवडीनंतर अॅड. सचिन वाघ यांनी ज्येष्ठ वकील, सहकारी, मार्गदर्शक व सर्व सदस्यांचे आभार मानले. संघटनेच्या माध्यमातून न्यायालयाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार असून वकिलांच्या हितासाठी विविध शिबिरे, प्रशिक्षण कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रम प्रभावीपणे राबविणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
