बारामती | निंबुत येथे हळद कंद प्रक्रियेचे प्रात्यक्षिक; शेतकऱ्यांना जैविक तंत्रज्ञानाची माहिती

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी 
ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत बारामती तालुक्यातील निंबुत येथे ३० जुलै रोजी शेतकऱ्यांसाठी हळद कंद प्रक्रिया या विषयावर प्रात्यक्षिकासह प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. हळद लागवडीपूर्वी कंद प्रक्रिया योग्य पद्धतीने केल्यास रोगांचा प्रादुर्भाव कमी होऊन उत्पादनात वाढ होते, याबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
प्रशिक्षणामध्ये हळदीच्या कंदावर प्रक्रिया करण्याची योग्य वेळ, रासायनिक व जैविक प्रक्रिया करण्यासाठी लागणारे साहित्य, त्याचे अचूक प्रमाण, द्रावण तयार करण्याची पद्धत तसेच प्रक्रिया करताना घ्यावयाची काळजी याबाबत प्रात्यक्षिकाद्वारे माहिती देण्यात आली.
यावेळी जैविक पद्धतीने कंद प्रक्रिया करण्याचे फायदे, उपयुक्त सूक्ष्मजीव व जैविक जिवाणूंचा योग्य वापर, मातीमधून होणाऱ्या बुरशीजन्य व इतर रोगांपासून पिकांचे संरक्षण करण्याच्या उपाययोजनांवरही मार्गदर्शन करण्यात आले. रासायनिक प्रक्रियेबरोबरच जैविक पर्यायांचा अवलंब केल्यास जमिनीची सुपीकता टिकून राहण्यास मदत होते आणि निरोगी पीक उत्पादन शक्य होते, असे सांगण्यात आले.
प्रात्यक्षिकादरम्यान उपस्थित शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध शंकांचे निरसन करून घेतले. अनेक शेतकऱ्यांनी आगामी हळद लागवडीत या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा निर्धार व्यक्त केला.

या प्रशिक्षणाचे आयोजन ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत कृषिकन्या जान्हवी डोळस, दिशा फडतरे, गायत्री जाधव, अनन्या हापसे, सुवर्णा लोखंडे, तन्वी मोरे आणि राजकुवर राजेभोसले यांनी केले
To Top