सोमेश्वर रिपोर्टर टीम----
बारामती : प्रतिनिधी
मोटार अपघातात पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर मिळालेल्या नुकसानभरपाईच्या रकमेतून पक्षकाराची तब्बल १० लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी बारामती न्यायालयाने आरोपी अॅड. बापू बाबुराव दिवेकर यांना भारतीय दंड संहिता कलम ४२० अंतर्गत दोषी ठरवत एक वर्ष सक्तमजुरी आणि २५ हजार दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास आणखी तीन महिने साधी कैद भोगावी लागणार आहे.
मा. टी. डी. इंगवले, न्यायिक दंडाधिकारी प्रथम वर्ग, कोर्ट क्रमांक ५, बारामती यांनी ३१ जुलै २०२६ रोजी हा निकाल दिला. फिर्यादी बाळासाहेब दत्तात्रय रणसिंग यांनी पत्नीच्या अपघाती मृत्यूनंतर मिळालेल्या नुकसानभरपाईसाठी आरोपी वकिलावर विश्वास ठेवला होता. आरोपीने व्यावसायिक फी म्हणून केवळ १ लाख काढणार असल्याचे सांगून सह्या घेतल्या; मात्र प्रत्यक्षात फिर्यादीच्या संयुक्त खात्यातून स्वतःच्या खात्यावर १० लाख वर्ग केल्याचे बँकेच्या प्रमाणित नोंदीतून सिद्ध झाले.
न्यायालयाने आरोपीचा ५० टक्के व्यावसायिक फीचा दावा फेटाळून लावत त्यास कोणताही लिखित करार किंवा पुरावा नसल्याचे नमूद केले. बँक अभिलेख, फिर्यादीची साक्ष आणि इतर पुराव्यांच्या आधारे फसवणुकीचा आरोप संशयापलीकडे सिद्ध झाल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
या प्रकरणातील फिर्यादी बाळासाहेब रणसिंग यांचे मार्च २०२६ मध्ये निधन झाले होते. तरीही त्यांच्या तक्रारीच्या आधारे सुरू असलेली फौजदारी प्रक्रिया सुरू राहिली आणि अखेर न्यायालयाने दोषीला शिक्षा सुनावली.
न्यायालयाने दंडाच्या २५ हजारांपैकी २० हजार रक्कम फिर्यादीच्या कायदेशीर वारसांना नुकसानभरपाई म्हणून देण्याचे, तर उर्वरित ₹५ हजार शासनजमा करण्याचे आदेश दिले आहेत. या खटल्यात सरकारी वकील ए. ए. रणसिंग, राहुल सोनवणे आणि होळकुंदे यांनी शासनाची बाजू मांडली, तर महिला पोलीस शिपाई सगुणा आवटे यांनी साक्षीदारांचा समन्वय आणि न्यायालयीन कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावली.
