बारामती l जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेतून जिरायत भागातील तलाव भरण्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचना

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
प्रतिनिधी : सोमेश्वरनगर
 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून बारामती विधानसभा मतदारसंघातील श्री शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, सोमेश्वर येथे आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचे' उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी महसूल विभागाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेले हे शिबिर ग्रामीण भागातील नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले. या शिबिरामुळे महसूल प्रशासन अधिक पारदर्शक, गतीमान, लोकाभिमुख आणि नागरिक केंद्रित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने सर्व धरणे शंभर टक्के भरली असल्याचे सांगत त्यांनी जानाई-शिरसाई योजनेद्वारे तालुक्यातील सर्व जलसाठे आणि तलाव तातडीने भरण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

विविध योजनांचा लाभ नागरिकांच्या दारात
उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या की, शासनाच्या निर्णयानुसार आयोजित करण्यात आलेल्या या महसूल समाधान शिबिरात पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ प्रत्यक्ष दिला जात आहे. शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या महसूल, ग्रामविकास व इतर विभागांशी संबंधित समस्या एकाच ठिकाणी सोडविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे हजारो महिलांची 'महिला शेतकरी' म्हणून नोंद झाली असून प्रशासन थेट नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचत असल्याने ही खरी लोकाभिमुख शासन व्यवस्था असल्याचे त्यांनी सांगितले.
महसूल विभागाचे क्रांतिकारी निर्णय
गेल्या दीड वर्षात महसूल विभागाने सातबारा, फेरफार, वारस नोंद, अकृषिक परवानगी यांसारख्या दैनंदिन सेवांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा केल्याचे त्यांनी सांगितले. या निर्णयांमुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचत असून शासनाच्या सेवा अधिक सुलभ झाल्या आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या यादीत राज्यातील ६१ हजार ९०० पात्र शेतकऱ्यांना ५२३ कोटी २२ लाख रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.

बारामतीतील विकास मॉडेल राज्यासाठी आदर्श
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीच्या सर्वांगीण विकासासाठी राबविलेल्या अनेक उपक्रमांची दखल शासनाने घेतली असून त्यातील अनेक योजना राज्यभर लागू करण्यात आल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. बारामती विधानसभा मतदारसंघात सुमारे १८ कोटी ८८ लाख रुपयांच्या निधीतून पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे उभारण्यात आले आहे. पानसरेवाडी येथे संमतीने पहिला शेतरस्ता मंजूर करण्यात आला असून सुपा मंडळात आणखी शंभर शेतरस्ते उभारले जाणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

दहा दिवसांचा कृती आराखडा
बारामती महसूल विभागाने दहा दिवसांचा विशेष कृती आराखडा राबवून शेतजमिनींच्या पोटहिश्श्यांची मोजणी, सातबारा अद्ययावत करणे, प्रधानमंत्री आवास योजना, सर्वांसाठी घरे, विहिरी व शेतघरांसाठी गौण खनिज उपलब्ध करून देणे अशा विविध उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी केली असल्याचे त्यांनी नमूद केले.
बारामतीला ३० खाटांचे क्रिटिकल केअर ब्लॉक
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत बारामतीसाठी ३० खाटांचे अत्याधुनिक क्रिटिकल केअर ब्लॉक मंजूर झाल्याची माहिती देताना त्यांनी सांगितले की, यामुळे गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच स्मार्ट व्हिलेज आणि इंटेलिजन्स व्हिलेज योजनेत महाराष्ट्रातील निवड झालेल्या ७५ गावांपैकी विक्रमी १० गावे बारामती तालुक्यातील असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला गती
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी, तसेच वित्त आयोग अथवा स्वनिधीतून हा प्रकल्प तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा परिषदेला दिल्या.

आर. एन. शिंदे यांची ७५ लाखांची देणगी
ज्येष्ठ उद्योजक आर. एन. शिंदे यांनी वाघळवाडी येथील आश्रमशाळेस दिवंगत अजित पवार यांच्या नावाने इमारत उभारण्यासाठी ५० लाख रुपये तसेच ग्रामपंचायत इमारतीसाठी २५ लाख रुपये अशी एकूण ७५ लाख रुपयांची देणगी जाहीर केली. याबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांचे विशेष आभार मानले.

कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, पंचायत समिती सभापती किरण तावरे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, नगराध्यक्ष सचिन सातव, सुयोग जगताप, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, जिल्हा परिषद सदस्य करण खलाटे, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे, तहसीलदार स्वप्नील रावडे, विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी, लाभार्थी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

सुमारे २० हजार नागरिकांना लाभ
उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांनी सांगितले की, या शिबिरात ३० विविध विभागांचे स्टॉल उभारण्यात आले असून सुमारे २० हजार नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या शेवटी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते लाभार्थ्यांना लाभ प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच महसूल व कृषी विभागाच्या सुधारणा आणि विविध कार्यालयीन सेवांवरील माहिती पुस्तिकेचेही प्रकाशन करण्यात आले.
To Top