Football World Cup l फायनलसाठी राज्यातील हॉटेल, कॅफे पहाटे ५ पर्यंत सुरू; जय पवार यांच्या मागणीला मुख्यमंत्र्यांची मंजुरी

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : हेमंत गडकरी
फिफा वर्ल्ड कप २०२६ च्या अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील फुटबॉलप्रेमींसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून राज्यातील हॉटेल, कॅफे व खाद्यगृहे पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत राज्य शासनाने गृह विभागामार्फत संबंधित आदेश जारी केले आहेत.
भारतीय प्रमाण वेळेनुसार आज मध्यरात्रीनंतर अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात फिफा वर्ल्ड कप २०२६ चा अंतिम सामना रंगणार आहे. जगभरातील कोट्यवधी फुटबॉलप्रेमींचे लक्ष या सामन्याकडे लागले असून महाराष्ट्रातील चाहत्यांमध्येही प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.
मात्र, मध्यरात्रीनंतर हॉटेल, कॅफे व खाद्यगृहे बंद होत असल्याने अनेक फुटबॉलप्रेमींना एकत्र येऊन सामना पाहता येणार नव्हता. ही बाब लक्षात घेऊन जय पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधत विशेष परवानगी देण्याची विनंती केली. मुख्यमंत्री यांनी या मागणीची दखल घेत गृह विभागाला आवश्यक आदेश काढण्याच्या सूचना दिल्या.
या निर्णयामुळे राज्यभरातील फुटबॉलप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण असून, अनेकांनी जय पवार आणि राज्य शासनाचे आभार व्यक्त केले आहेत. फुटबॉल चाहत्यांना अंतिम सामन्याचा आनंद निर्बंधांशिवाय घेता यावा, यासाठी घेतलेल्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.
To Top