सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
प्रतिनिधी : संतोष माने
पुणे, सोलापूर, अहिल्यानगर या जिल्ह्यांना वरदायिनी ठरणाऱ्या उजनी धरणामध्ये पुणे व वरील धरण क्षेत्रात पाऊस पडत असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. आज सकाळी नदीतून १४,३५१ कयुसेक ने उजनी धरणात पाण्याचा विसर्ग येत आहे. आज रोजी उजनी धरण वजा २७.२३ टक्के आहे.
गेल्या वर्षी याच दिवशी उजनी धरण हे ८१.७५ टक्के होते. यावर्षी उजनी धरण भरेल की नाही याबाबत उजनीलगतच्या पाणलोट क्षेत्रातील शेतकरी चिंतेत होता. मात्र गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहर व वरील धरण क्षेत्रात मुसळधार प्रमाणात पाऊस सुरू असल्याने तेथील पाणी उजनी मध्ये येण्यास सुरुवात झाली आहे.
उजनी धरणा वरती संपूर्ण सोलापूर जिल्हा, सोलापूर शहराची पाणीपुरवठा योजना, औद्योगिक वसाहती, तसेच पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील साखर कारखाने, कागद प्रकल्प, अनेक गावच्या पाणीपुरवठा योजना, तसेच बारामती शहराची पाणीपुरवठा योजना, बारामती औद्योगिक वसाहत, त्याचबरोबर कर्जत व करमाळा तालुक्यातील शेती, त्याप्रमाणे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे भवितव्य सुद्धा उजनी धरणा वरती अवलंबून आहे.
त्यामुळे उजनी धरणाला वरदायिनी समजले जाते. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या काळात उजनी धरणाची निर्मिती झाली. त्यामुळे उजनी धरण हे नाव असले तरी, या धरणाला यशवंत सागर म्हणून संबोधले जाते. काल रोजी दौंड येथून आठ हजार कयुसेक ने पाण्याचा विसर्ग येत होता. आज मात्र वरील धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने उजनी मध्ये येणाऱ्या पाण्याच्या निसर्गामध्ये दुपटीने वाढ झाली आहे. आज सकाळी १४३५१ कयुसेक ने पाण्याचा विसर्ग दौंड येथून येत आहे. सतत पाऊस सुरू राहिल्यास या विसर्ग मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
