सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
इंदापूर : संतोष माने
शेतीचे तुटपुंजे क्षेत्र, वडील एका खासगी कंपनीत कंत्राटी कामगार आणि घरची हलाखीची परिस्थिती... अशा प्रतिकूल परिस्थितीवर जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर मात करत इंदापूर तालुक्यातील भादलवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी शिवानी पांडुरंग जाधव हिने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
फेब्रुवारी महिन्यात झालेल्या या परीक्षेत शिवानीने पुणे जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवत शिष्यवृत्तीधारक होण्याचा मान पटकावला आहे. तिच्या या यशामुळे भादलवाडी गावासह संपूर्ण इंदापूर तालुक्यात तिचे कौतुक होत आहे.
आपल्या यशाबाबत बोलताना शिवानी म्हणाली, "घरची परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द आणि चिकाटी सोडता कामा नये. नियमित अभ्यास, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विशेषतः शिक्षिका अनुश्री चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन यामुळेच हे यश मिळवता आले."
शिवानीच्या या यशामुळे तिच्या कुटुंबाचा, शाळेचा आणि गावाचा गौरव झाला असून, तिच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिचे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
