सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील ग्रामीण भागातील राजकीय घडामोडींना सध्या ब्रेक लागण्याची चिन्हे दिसत आहेत. ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका यंदा न होता थेट २०२७ मध्ये होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तयारीत असलेल्या इच्छुक उमेदवारांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे.
वर्ष २०२४, २०२५ आणि २०२६ मध्ये मुदत संपलेल्या एकूण १५ हजार ६३६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्य निवडणूक आयोगाने या ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचना आणि प्रभाग आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण केली असून, प्रभाग आरक्षण अंतिम करण्यात आले आहे. मात्र, सध्या सुरू असलेल्या विशेष सखोल मतदारयादी पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेमुळे निवडणुकीच्या कार्यक्रमावर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे.
सामान्यतः प्रभाग आरक्षण जाहीर झाल्यानंतर प्रभागनिहाय मतदारयाद्या तयार करून निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जातो. मात्र, यावेळी मतदारयादीतील मृत, स्थलांतरित आणि अपात्र मतदारांची नावे वगळण्याचे काम सुरू असल्याने अंतिम मतदारयादी ७ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणार आहे.
बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी नव्या आणि अद्ययावत मतदारयादीच्या आधारेच निवडणुका घ्याव्यात, असा आग्रह अनेक जिल्हाधिकाऱ्यांनी नोंदवला आहे. त्यामुळे अंतिम मतदारयादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रभागनिहाय यादी तयार करण्यासाठी आणखी एक ते दीड महिना लागण्याची शक्यता आहे.
यामुळे नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणे अवघड ठरणार असून, ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम थेट २०२७ मध्ये जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी, राज्यातील ग्रामीण राजकारणाला काही काळासाठी विराम मिळण्याची चिन्हे आहेत.
