Mahabaleshwar Breaking I भिगवणच्या २५ वर्षीय पर्यटकाची पाचगणीत हत्या; चौघे ताब्यात

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
पाचगणी : सचिन भिलारे 
महाबळेश्वर-पाचगणी परिसरातील भोसे गावात पर्यटनासाठी आलेल्या २५ वर्षीय पर्यटकाचा स्थानिक चौघांनी बेदम मारहाण केल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घराच्या दिशेने डोकावल्याचा संशय आल्याच्या कारणावरून हा हल्ला झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, पाचगणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.
मृत पर्यटकाचे नाव अक्षय रमेश जाधव (रा. भिगवण, ता. इंदापूर, जि. पुणे) असे आहे. या प्रकरणी सूर्यकांत चंद्रकांत गोळे (रा. भोसे, ता. महाबळेश्वर), अविनाश सतीश भोसले (रा. बावधन, ता. वाई), राहुल जनार्दन राजपुरे (रा. कनुर, ता. वाई) आणि अमोल गणेदेव वाडकर (रा. चिखली, ता. वाई) या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदापूर तालुक्यातील विशाल अजित जाधव, अक्षय जाधव आणि त्यांचे मित्र पर्यटनासाठी महाबळेश्वर-पाचगणी परिसरात आले होते. ते भोसे येथील 'अतिथी व्हिला हॉटेल अँड लॉज'मध्ये मुक्कामाला होते. बुधवारी (ता. ८) रात्री मित्रांनी हॉटेलमध्ये मद्यप्राशन केले. अक्षयने जास्त मद्यप्राशन केल्याने मित्रांनी त्याला खोलीत झोपवून बाहेरून कडी लावली आणि ते टेरेसवर बसले.
काही वेळाने खोलीत परतल्यावर अक्षय तेथे नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्याचा शोध घेत असताना हॉटेलपासून सुमारे २०० मीटर अंतरावर गर्दी दिसली. तेथे पोहोचल्यावर काही स्थानिक व्यक्ती अक्षयला लाकडी काठ्या, दगड तसेच हाताबुक्यांनी बेदम मारहाण करत असल्याचे मित्रांनी पाहिले. घरात डोकावल्याच्या संशयातून हा हल्ला झाल्याचे समोर आले आहे. गंभीर जखमी झालेल्या अक्षयला मित्रांनी स्थानिकांच्या मदतीने प्रथम पाचगणी येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी वाई आणि नंतर बारामती येथील डॉ. बोके रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

या घटनेनंतर पाचगणी पोलिसांनी झिरो क्रमांकाने दाखल झालेल्या गुन्ह्याची नोंद घेऊन खुनाचा गुन्हा दाखल केला असून, चारही संशयितांना ताब्यात घेतले आहे. वाईचे पोलिस उपअधीक्षक श्री. साळुंखे तसेच पाचगणी पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक डी. जी. पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पाचगणी पोलीस करीत आहेत.
To Top