Jawali Breaking l जावली पंचायत समितीचे उपसभापती गोरख महाडिक यांच्यासह दोघे अटकेत; फसवणूक प्रकरणात न्यायालयाचा आदेश

सोमेश्वर रिपोर्टर live

सोमेश्वर रिपोर्टर टीम----
मेढा : सोमनाथ साखरे
जावली पंचायत समितीचे विद्यमान उपसभापती गोरख महाडिक यांच्यासह सचिन बेलोशे आणि संदीप क्षीरसागर यांना फसवणुकीच्या गुन्ह्याप्रकरणी मेढा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशानुसार पोलिसांनी अटक केली. तिघांची जिल्हा कारागृहातील न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असून या घटनेमुळे जावली तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सन २०१३ मध्ये जमिनीचे बनावट दस्तऐवज तयार करून फसवणूक केल्याचा आरोप या प्रकरणातील आरोपींवर आहे. या प्रकरणात गोरख महाडिक, विकास देशमुख, संदीप क्षीरसागर, सचिन बेलोशे यांच्यासह एकूण सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल झाले होते.
दरम्यान, न्यायालयीन सुनावणीसाठी वारंवार गैरहजर राहत असल्याने संबंधित आरोपींविरोधात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी अटक वॉरंट जारी केले होते. हे वॉरंट रद्द करून घेण्यासाठी गोरख महाडिक, संदीप क्षीरसागर आणि सचिन बेलोशे हे सोमवारी मेढा न्यायालयात हजर झाले. मात्र, न्यायालयाने त्यांना तत्काळ अटक करण्याचे आदेश पोलिसांना दिले.
आदेशानुसार पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन त्यांची जिल्हा कारागृहातील न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. विद्यमान उपसभापतींना अटक झाल्याने जावली तालुक्यात राजकीय आणि सामाजिक वर्तुळात या घटनेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
To Top