Koyana Dam Update l साताऱ्यात पावसाचा जोर कायम; कोयना धरण ३३.९३ टक्के भरले, ९३ हजार क्युसेक्सची आवक

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
सातारा : प्रतिनिधी 
सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणात मंगळवार (७ जुलै) सकाळी १० वाजेपर्यंत ३५.७१ टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण ३३.९३ टक्के भरले आहे. धरणात सध्या ९३ हजार क्युसेक्स वेगाने पाण्याची आवक सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली.
जिल्ह्यात ७ जुलैअखेर २८८.७ मिमी सरासरी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. यापैकी २२ महसूल मंडळांमध्ये ६५ मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला असून महाबळेश्वर महसूल मंडळात सर्वाधिक ३९२.८ मिमी पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल लामज, बामणोली आणि तापोळा येथे प्रत्येकी १६९ मिमी, वाठार येथे १४८.५ मिमी, पाचगणी येथे १३६.५ मिमी, करहर व केळघर येथे प्रत्येकी १२४.५ मिमी, पसरणी येथे ११०.३ मिमी, तर पाटण येथे १००.५ मिमी पाऊस झाला.
मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर तालुक्यातील नावली, धावली व रुळे तसेच जावली तालुक्यातील बहुले आणि बोंडारवाडी येथील एकूण ६३ नागरिकांचे अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा, मंदिरे व नातेवाईकांच्या घरी तात्पुरते सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.
जिल्ह्यात पावसामुळे आतापर्यंत ८३ घरांचे नुकसान झाले असून त्यामध्ये पाटण तालुक्यात ३९, सातारा ९, खंडाळा २, जावली ११, वाई १३ आणि महाबळेश्वर ९ घरांचा समावेश आहे. नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

याशिवाय सातारा तालुक्यातील केरी येथील प्राथमिक शाळेचे पत्रे उडाले असून खंडाळा तालुक्यातील मिरजे येथील प्राथमिक शाळा आणि स्मशानभूमीची भिंत कोसळून नुकसान झाले आहे. पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धबधबे, सखल भाग आणि पाणी साचणाऱ्या ठिकाणी प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्येही पाणीसाठा वाढत आहे. धोम धरण ४८.८१ टक्के, धोम-बलकवडी ५३.१९ टक्के, कण्हेर ६२.२८ टक्के, उरमोडी ४५.१८ टक्के आणि तारळी धरण २९.५७ टक्के भरले आहे.

पावसामुळे झाडे पडणे, दरडी कोसळणे आणि रस्ते खचण्याच्या घटना घडत असल्याने संबंधित यंत्रणांनी तत्काळ कार्यवाही करून वाहतूक सुरळीत ठेवावी तसेच दरडप्रवण भागातील नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले आहेत.
To Top