सोमेश्वर रिपोर्टर टीम----
लोणंद : निलेश काशिद
लोणंद–फलटण मार्गावरील तरडगाव पुलाजवळ भरधाव कारने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक युवक गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी कारचालकाविरुद्ध लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. १०) रात्री सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास तरडगाव (ता. फलटण) हद्दीतील तरडगाव पुलाच्या पश्चिम बाजूस लोणंद–फलटण मार्गावर हा अपघात झाला. सचिन वसंत काशिद (रा. काशिदवाडी, ता. फलटण) हा त्याच्या ताब्यातील टाटा अल्ट्रोझ (क्र. MH 12 ZC 6527) ही कार भरधाव व निष्काळजीपणे चालवत असताना समोर जाणाऱ्या बिगर क्रमांकाच्या हिरो स्प्लेंडर दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याचा आरोप आहे.
या भीषण अपघातात राजेंद्र साहेबराव क्षीरसागर (वय ४०, रा. गोटेमाळ, लोणंद) व अभिषेक धनंजय कणसे (वय २४, रा. शेरेचीवाडी, ता. फलटण) यांचा गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाला. तर अलंकार सूर्यकांत फडतरे (वय २४, रा. घाडगे कॉलनी, लोणंद) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर कारचालकाने जखमींना उपचारासाठी न नेता तसेच पोलिसांना माहिती न देता घटनास्थळावरून पळ काढल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
याप्रकरणी संतोष साहेबराव क्षीरसागर (रा. शिरवळ, ता. खंडाळा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रोहित हेगडे करीत आहेत
