सोमेश्वर रिपोर्टर टीम----
बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुक्याचे माजी शिवसेना तालुकाप्रमुख हनुमंत भापकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवास संपवत पुन्हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भगवा झेंडा स्वीकारून आणि शिवबंधन बांधून त्यांनी स्वगृही परतल्याची घोषणा केली.
भापकर यांनी २०११ मध्ये जिरायत भागातील सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा या अपेक्षेने तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी नाझरे धरणाची उंची, खोली व रुंदी वाढविणे तसेच जिरायत भागातील सिंचनाच्या विविध मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन मिळाले होते. मात्र, अपेक्षित कामे झाली नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करत पुन्हा शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.
भापकर यांनी यापूर्वी आठ वर्षे बारामती तालुकाप्रमुख म्हणून तसेच विविध संघटनात्मक पदांवर तब्बल १७ वर्षे काम केले आहे. स्वगृही परतल्याचा आनंद असून आता अधिक जोमाने जनतेसाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बारामतीच्या जिरायत भागातील शेतीसाठी कायमस्वरूपी सिंचनाची व्यवस्था व्हावी, कऱ्हा–नीरा नदीजोड प्रकल्पातून बारमाही पाणी मिळावे आणि नाझरे धरणाच्या विस्ताराचे काम तातडीने व्हावे, ही आपली प्रमुख भूमिका कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शासनाने मंजूर केलेल्या कऱ्हा–नीरा नदीजोड प्रकल्पातून सर्व जिरायत भागातील शेतकऱ्यांना समान लाभ मिळावा, अशी मागणीही त्यांनी केली.
यावेळी त्यांनी बारामतीतील विविध शासकीय विभागांमध्ये मनमानी व भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला. पोलीस, महसूल, कृषी, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, पंचायत समिती तसेच घरकुल आणि शौचालय योजनांतील लाभार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लोकशाही मार्गाने संघर्ष सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रवेश सोहळ्यास खासदार संजय राऊत, जिल्हाप्रमुख उल्हास शेवाळे, जिल्हाप्रमुख संजय काळे, बारामती विधानसभा संपर्कप्रमुख आदिनाथ कोठाडिया तसेच पुणे जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करताना वीज महावितरण समिती, जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समिती, दुष्काळ निवारण समिती आदी विविध पदांवर काम करण्याचा अनुभव मिळाल्याचे सांगत, त्या अनुभवाचा उपयोग सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी करणार असल्याचे भापकर यांनी नमूद केले. तसेच बारामती विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी सर्व आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
