Pimpari-Chinchvad Breaking l मोशीत इमारत कोसळली : १४ ते १५ जण अडकल्याची भीती

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
पुणे : प्रतिनिधी 
पिंपरी-चिंचवडमधील मोशी परिसरात बुधवारी एक इमारत कोसळल्याची गंभीर घटना घडली. या दुर्घटनेत इमारतीखाली सुमारे १४ ते १५ जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून, बचाव पथकांकडून युद्धपातळीवर मदत आणि शोधकार्य सुरू आहे.
सदर इमारत मोशी कचरा डेपोला लागून असल्याची माहिती आहे. प्राथमिक माहितीनुसार, अतिवृष्टीमुळे कचऱ्याच्या डोंगराचा काही भाग इमारतीवर कोसळल्याने ही दुर्घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, दुर्घटनेचे नेमके कारण अधिकृत चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, पुणे शहर, उपनगरे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. सातत्याने होत असलेल्या पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून, शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली आहे. औद्योगिक तसेच निवासी भागांमध्येही पावसाची संततधार सुरू असल्याने नागरिक आणि नोकरदारांना प्रवासादरम्यान मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू असून, धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. तसेच पिंपरी-चिंचवडमधून वाहणाऱ्या पवना आणि इंद्रायणी नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने नदीकाठच्या, विशेषतः सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांनी नदीपात्रात न उतरण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
To Top