Pimpri-Chinchwad News | पवना धरण ७७ टक्के भरले तरी १५ टक्के पाणी कपात कायम; नागरिकांकडून नाराजी

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी 
शहराची तहान भागवणारे पवना धरण सध्या ७७ टक्के भरले असतानाही पिंपरी-चिंचवड महापालिकेने लागू केलेली १५ टक्के पाणी कपात कायम ठेवली आहे. धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाल्यानंतरही कपात मागे न घेतल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात असून, "धरणात पुरेसे पाणी असताना कपात का?" असा सवाल उपस्थित केला जात आहे.
यंदा मान्सूनच्या सुरुवातीला अपेक्षित पाऊस न झाल्याने जूनअखेरीस पवना धरणातील पाणीसाठा चिंताजनकरीत्या घटला होता. या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाच्या सूचनेनुसार महापालिकेने शहरात १५ टक्के पाणी कपात लागू केली होती. त्यानुसार नागरिकांच्या पाणीपुरवठ्याच्या वेळेतही कपात करण्यात आली.
मात्र, जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पवना धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून धरण ७७ टक्के भरले आहे. तसेच पवना आणि इंद्रायणी नद्यांनाही पूरस्थिती निर्माण झाली होती. तरीही महापालिकेने पाणी कपात कायम ठेवल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे की, उपलब्ध पाण्याचे पुढील काही महिन्यांसाठी योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. त्यामुळे धरण पूर्ण क्षमतेने म्हणजेच १०० टक्के भरल्यानंतरच पाणी कपात हटविण्याबाबत निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान, पाणी कपातीसोबतच पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी विशेष पथकेही नियुक्त करण्यात आली होती. मात्र, पाणी वाया घालवणाऱ्यांवर अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

आता पुढील काही दिवसांतील पावसावरच पवना धरण पूर्ण क्षमतेने भरणार की नाही आणि पिंपरी-चिंचवडकरांची १५ टक्के पाणी कपातीपासून कधी सुटका होणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
To Top