Baramati News l दर्जेदार रोप निर्मितीचे शास्त्र शेतकऱ्यांपर्यंत : सदोबाचीवाडीत कृषीदूतांनी दिले मार्गदर्शन

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी 
कृषी महाविद्यालय, बारामती येथील कृषीदूतांच्या वतीने सदोबाची वाडी येथे "शास्त्रोक्त पद्धतीने रोप निर्मिती" या विषयावर प्रात्यक्षिक व मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमात शेतकऱ्यांना दर्जेदार व निरोगी रोपे तयार करण्याच्या आधुनिक व शास्त्रीय पद्धतींचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
यावेळी कृषीदूतांनी ट्रे, कोकोपीट, वर्मीक्युलाइट, पर्लाइट, शेणखत व गांडूळखत यांचा वापर करून रोप निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली. तसेच बियाण्यांची योग्य निवड, रोपवाटिका उभारणी, रोपांची निगा आणि शास्त्रोक्त पद्धतीचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
शास्त्रीय पद्धतीने तयार केलेल्या रोपांमुळे बियांची उगवण चांगली होते, रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो, रोपे अधिक निरोगी व सक्षम तयार होतात आणि उत्पादनात वाढ होण्यास मदत होते, असे कृषीदूतांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांनी विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. मार्गदर्शनाला उपस्थित शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत अशा प्रात्यक्षिक व प्रशिक्षणपर कार्यक्रमांचे नियमित आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

या उपक्रमासाठी कृषीदूत देवदत्त पुरंदरे, निखिल नाळे, ईश्वर कुंभार, राहुल आकिवटे, अनिकेत कावळे, ऋषी पाठक आणि व्यंकटेश इमानी यांनी विशेष परिश्रम घेतले.
To Top