Satara Crime | मॅगीच्या बॉक्सच्या आड दारूची तस्करी उघड; २ कोटींचा मुद्देमाल जप्त

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
सातारा : प्रतिनिधी 
 सातारा तालुक्यातील शिवथर परिसरात गोव्याहून इंदौरकडे निघालेल्या दारूच्या कंटेनरवर सातारा तालुका पोलिसांनी धाड टाकत सुमारे २ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मॅगीच्या बॉक्सच्या आड मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या लपवून वाहतूक केली जात असल्याचे उघडकीस आले. ही कारवाई पोलिसांची रेकॉर्डब्रेक कामगिरी मानली जात आहे.
या प्रकरणी प्रेमकुमार जनकधारी सिंग (वय ५८, रा. कोलकाता) याला अटक करण्यात आली असून, दिल्लीतील आणखी एका संशयिताचा पोलिस शोध घेत आहेत. सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१९ जुलै रोजी गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी शिवथर येथे सापळा रचला. आरजे १४ जीआर ०५३९ क्रमांकाचा कंटेनर थांबवून तपासणी केली असता सुरुवातीला मॅगीचे बॉक्स आढळले. मात्र, कंटेनरमधून येणाऱ्या दारूच्या वासामुळे संशय बळावला. बॉक्स बाजूला केल्यानंतर त्यामागे मोठ्या प्रमाणात दारूचे बॉक्स लपवून ठेवले असल्याचे उघड झाले.
पोलिसांनी सुमारे १ कोटी ५७ लाख रुपयांची दारू आणि कंटेनरसह एकूण २ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त केलेल्या दारूचे नमुने प्रयोगशाळेत पाठवून त्याची तपासणी करण्यात येणार असून, या तस्करीमागील संपूर्ण रॅकेटचा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
To Top