Pune Breaking | पुणे जिल्हा परिषद सभेत आत्मदहनाचा प्रयत्न; सदस्य मंगेश जगताप यांच्यावर तरुणीचे गंभीर आरोप

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
पुणे : प्रतिनिधी
पुणे जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सुरू असताना सोमवारी एक धक्कादायक प्रकार घडला. विविध विकासकामांवर चर्चा सुरू असतानाच एक तरुणी अचानक सभागृहात घुसली आणि सोबत आणलेले पेट्रोल स्वतःच्या अंगावर ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेमुळे सभागृहात एकच खळबळ उडाली.

या तरुणीने बारामतीचे जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जगताप यांनी अनेक वर्षे लग्नाचे आमिष दाखवून आपली फसवणूक केल्याचा आरोप तिने केला. वारंवार न्याय मागूनही तो न मिळाल्याने संतप्त होऊन हे टोकाचे पाऊल उचलल्याचे तिने सांगितले.

दरम्यान, घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आणि सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान राखत तातडीने धाव घेतली. त्यांनी तरुणीला पुढील पाऊल उचलण्यापासून रोखल्याने मोठा अनर्थ टळला.

यानंतर पोलिसांनी संबंधित तरुणीला ताब्यात घेत उपचारासाठी जवळील खासगी रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

या घटनेनंतर जिल्हा परिषद परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला असून, प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
To Top