Purandar News | स्वर्गीय अजितदादांची जयंती आणि देवेंद्र फडणवीसांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
जेजुरी : पंढरीनाथ शिंदे
पुरंदर तालुक्यातील मौजे आंबोडी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री कै. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
यावेळी आंबोडी येथील माया केअर सेंटर या वृद्धाश्रमातील ३५ निराधार ज्येष्ठ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर आजारानुसार आवश्यक औषधांचे वाटप सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. घोळवे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास सासवड नगरपालिकेचे नगरसेवक संकेत जगताप, डॉ. शुभांकर देशमुख, डॉ. वर्षा देशमुख, डॉ. भाटे दांपत्य, अंकुशराव देशमुख, अमोल जगताप, प्रा. राजेश काकडे यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक घोळवे यांनी आपल्या मनोगतातून आई-वडिलांचे महत्त्व अधोरेखित करत समाजातील वास्तवावर प्रकाश टाकला. तर प्रा. राजेश काकडे यांनी डॉ. भाटे दांपत्य करत असलेल्या विनामूल्य आरोग्य सेवेची माहिती देत त्यांच्या सामाजिक कार्याचा आढावा उपस्थितांसमोर मांडला.

यावेळी संकेत जगताप व अमोल जगताप यांनी वृद्धाश्रमासाठी भरीव मदत जाहीर केली. तसेच अंकुशराव देशमुख यांनी वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांच्या वर्षभराच्या उदरनिर्वाहाच्या खर्चाचे नियोजन करण्याची जबाबदारी स्वीकारली.

आरोग्य शिबिरात डॉ. शुभांकर देशमुख व डॉ. वर्षा देशमुख यांनी ज्येष्ठ नागरिकांची तपासणी केली. आरोग्य सेवक संदीप व्हनगाडे, अजित पांडोळे आणि निलेश नाझीरकर यांनी तपासणीसाठी सहकार्य केले. कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले.
To Top